News

वैष्णवी ची दखलभविष्यात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न !

दहा हजार इंग्रजीचे शब्द स्वयंस्फूर्तीनेच पाठ

पहिली ते आठवीच्या इंग्रजी, गणित व विज्ञानच्या १३ इंग्रजी शब्दकोषातील शब्द स्पेलिंगसह अचूक सांगण्यामागे स्वयंस्फूर्ती महत्त्वाची ठरली. शब्द पाठ करण्याच्या छंदामुळे तब्बल दहा हजार शब्द पाठ होऊ शकले, अशी प्रतिक्रिया वैष्णवी पोटे हिने दिली.

वैष्णवी पोटे हिच्या इंग्रजी शब्दार्थ पाठांतराची दखल इंडियन बुक आॅफ रेकॉर्डने घेतल्याबद्दल तिचा जालना येथे एका कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. ‘लोकमत’ने वैष्णवी पोटे हिची मुलाखत घेतली असता तिने ही प्रतिक्रिया दिली. वैष्णवी कैलास पोटे ही मूळची जालना जिल्ह्यातील कीर्तापूर (ता. मंठा) येथील आहे. वैष्णवी एका शेतकरी कुटुंबातील आहे. वडिलांचे शिक्षण बारावीपर्यंत तर आई शिवगंगा पोटे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. १५ एकर कोरडवाहू शेतीवर पोटे कुटुंबिय उदरनिर्वाह करतात. शिक्षणानेच जीवनाचा उत्कर्ष होतो, हे ओळखून पोटे दांपत्याने वैष्णवी हिला मंठा येथील गुरुकुल प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये पहिल्या वर्गात दाखल केले. वैष्णवी हिला तिसऱ्या वर्गात आल्यापासून इंग्रजीचे शब्दार्थ पाठ करण्याचा छंद लागला. स्वयंस्फूर्तीचीच प्रेरणा घेत शब्द पाठ करण्यावर भर दिला. वैष्णवीने सलग दोन वर्ष इंग्रजीमधून स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. या शैक्षणिक वर्षापासून तिने सेलू येथील नूतन विद्यालयाच्या सहाव्या वर्गात प्रवेश घेतला आहे.