News

गुणवंतांचा सत्कार २०१७

प्रत्येकाने राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवणे गरजेचे - प्रा. चंद्रकांत जोशी

(नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील गुणवंताच्या सत्कारप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रा.चंद्रकांत जोशी. यावेळी उपस्थित जयप्रकाश बिहाणी , डी.के.देशपांडे, डॉ.एस.एम.लोया, अँड.वसंतराव खारकर, विनोद बोराडे, डॉ.विनायकराव कोठेकर आदी.  छायाचित्र : किरण फोटो, सेलू )

आज सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा स्थितीत प्रत्येकाने राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त ग्रंथपाल, माहिती अधिकारी प्रा. चंद्रकांत जोशी यांनी गुरुवार दि. ०६ जुलै २०१७ रोजी सेलू येहते केले.

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ७८ व वर्धापन दिन श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया होते. यावेळी नगराध्यक्ष श्री. विनोद बोराडे, संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. वसंतराव खारकर, चिटणीस श्री. डी. के. देशपांडे, सहचिटणीस श्री. विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 

प्रा. जोशी पुढे म्हणाले, नूतन शिक्षण संस्थेने सुजाण, राष्ट्रभक्त व समाजाभिमुख नागरिक घडविण्याचे ध्येय समोर ठेवलेले आहे. विविध क्षेत्रात संस्थेचे विद्यार्थी कार्यरत आहे. एक आदर्श व प्रेरणादायी संस्था म्हणून नूतन संस्थेचा आजही नावलौकिक कायम आहे. असे सांगून नूतन महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवासाठी पंचेवीस हजार रुपयाची आर्थिक मदत प्रा. जोशी यांनी जाहीर केली. श्री. बोराडे म्हणाले कि नूतन संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान वाटतो व मी स्वतःला भाग्यवान समजतो. असे म्हणून संस्थेच्या विकासासाठी दहा लाख रुपयाचा निधी नगरपालिके तर्फे उप्लब्धकरून देण्याचे जाहीर केले. संस्थेच्या विविध घटकातील दहावी, बारावी, पदवी व विविध स्पर्धा परीक्षेतील व कला, क्रीडा, अभिनय इत्यादी क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव प्रमाणपत्र व रोपटे देऊन करण्यात आला. प्रास्ताविकातून संस्थेचे चिटणीस डी. के. देशपांडे यांनी संस्थेसाठी श्रीरामजी भांगडिया यांनी मोठे कार्य केले आहे. ते जातं करण्याची जबाबदारी संस्थाचालक व्यवस्थित पार पाडत आहे. आज आठ हजार दोनशे पासष्ट विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत आहे. अध्यक्षीय भाषणात माजी विद्यार्थी संस्थेची संपत्ती आहे असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया यांनी सांगितले. प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ व श्रीरामजी भांगडिया यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन अशोक लिंबेकर यांनी केले तर एम. पी. ठोंबरे यांनी  आभार मानले.